Monday, November 11, 2013

अव्यक्त

भावनांना शब्दात बांधता येत नाही
आनंदाचा हिशोब मांडता येत नाही
मजा पहिल्या पावसात भिजण्याची,
कविता लिहून सांगता येत नाही

Monday, October 28, 2013

थकवा

आयुष्याच्या चढणीवर जेव्हा मन थकतं
मागे वळून आठवणींची वळणं  बघतं
आजवरच्या प्रवासावर स्वतःशीच हसतं
दूरचं शिखरसुद्धा तेव्हा जवळ भासतं

Wednesday, July 3, 2013

भीती वाटते

मन मेलेल्या जगात ..
जगायचीही ... भीती वाटते

भावनांना लागलीय स्वार्थाची बुरशी
कुणालाच कुणाची पर्वा नाहीये फारशी
ह्या आपमतलबी दुनियेत कुणाला ...
आपलं म्हणायची ... भीती वाटते

देवाचा बाजार झालाय, अन् धर्माचं राजकारण
पैशाचा बनलाय देव, अन् तत्वांना फक्त मरण
माणूसकी नसलेल्या समाजात
स्वतःला माणूस म्हणायची ... भीती वाटते

Wednesday, May 1, 2013

राहूनच गेलं

उद्याची चिंता करताना
आजचं जगायचं राहूनच गेलं
भविष्याची चित्रं रंगवताना
आठवणी साठवायचं राहूनच गेलं

पहिल्या पावसात...
तुटलेली छत्री संभाळताना
सुटलेली train  पकडताना
मृद्गंध मनसोक्त अनुभवत
बेधुंद भिजायचं राहूनच गेलं

Attractive career  मागे
अभ्यासात डोकं खुपसताना
Office ची कामं उपसताना
जिवाला जीव देणारे
मित्र जपायचं राहूनच गेलं

कधी वाटतं ...
घड्याळाचे काटे मागे वळवावेत
गमावलेले क्षण परत बोलवावेत
इतकं सुख दिलं क्षणांनी, पण त्यांना
Thank you म्हणायचं राहूनच गेलं

Sunday, April 28, 2013

उन्हाळ्याची सुट्टी

उन्हाळ्याची सुट्टी
शाळेला बुट्टी...
अभ्यासाशी कट्टी
मजेशी बट्टी ...

Saturday, April 20, 2013

मी ..

पायखालचा मार्ग बदलतोय
स्वप्नातला स्वर्ग बदलतोय
मागे वळून पाहिलं की वाटतं
माझ्यातला मी बदलतोय

Wednesday, April 17, 2013

आठवणी ..

दुरावलेले जिवलग समीप वाटतात
डोळ्यात नकळत अश्रू साठतात
कितीही टाळल्या तरी ,
मनात कधीकधी आठवणी दाटतात

मजा ..

हरून पुन्हा लढण्यात मजा आहे
संकटावर हसण्यात मजा आहे
काळरात्रीची चिंता न करता
पहाटेसाठी जागण्यात मजा आहे

क्षण..

आजचा क्षण जगावा कालचा विचार न करता
आजचा क्षण जगावा उद्याची चिंता न करता
आजचा क्षण जगावा कुणाची पर्वा न करता
आजचा क्षण जगावा फक्त ... आजच्यापुरता

आजचा माणूस...

विचार आहे,शब्द नाही
भाव आहे, व्यक्त नाही
सुख आहे ओसंडले पण ..
मन अजुनी शांत नाही

कविता ...

अंधारलेल्या मनात विचारांचा दिवा धरू नये
भावनांच्या मातीत शब्दांचे बीज पेरू नये
आशय संपलेल्या जगासाठी
कविता पुन्हा करू नये

सुख ...

आंबट गोड आठवणी चाखण्यात असतं
भविष्याची स्वप्नं पाहण्यात असत
आज काय हवं हे जाणण्यात असतं
सुख खरतर मानण्यात असतं